Shri Sant Shankar Maharaj
            

श्री संत शंकर महाराज आश्रम व विश्वमंदिर भक्तिधाम

श्री क्षेत्र पिंपळखुटा ता. धामणगांव(रेल्वे) जि. अमरावती (महा.)

श्री संत शंकरमहाराज यांच्याविषयी थोडेसे...

श्री संत शंकर महाराज आश्रम व विश्वमंदिर भक्तिधाम

विदर्भात अमरावतीपासून ४२ किलोमीटर पूर्वेस वर्धा नदीच्या किनारी वसलेले श्रीक्षेत्र पिंपळखुटा हे गाव आहे. १९९६ साली या गावाची लोकसंख्या फक्त १५७५ व उंबरठा फक्त ३३५ इतके हे लहान गाव आहे. येथील मैलाच्या दगडावरदेखील या गावाचे नाव नाही. इतक्या लहान गावात दिनांक १९-८-१९४५ रोजी शुक्रवारी काजळती (हरतालिका) च्या दिवशी श्री संत शंकर बाबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री. बुधाजी नागपुरे व आईचे नाव भागीरथीबाई आहे. त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. त्यांना दोन भाऊ व चार बहिणी आहेत. श्री शंकर बाबांचा जन्म झाला त्या वेळी घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अशा परिस्थितीत श्री बाबांचे बालपण अतिशय हलाखीत गेले. त्या वेळेस खेड्यामध्ये शिक्षणाची तुटपुंजी व्यवस्था होती. तशाही स्थितीत श्री बाबांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाकरिता शाळेत ठेवले. त्यांचे कसेतरी चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण झाले व पुढे शिक्षणाकरिता घरची परिस्थिती आडवी आली. त्यामुळे पुढचे शिक्षण तेथेच थांबले. अशा परिस्थितीत त्यांना दुसयांची गुरेढोरे राखणे, घरची कामे करणे, शेतीची कामे करणे, ही कामे त्यांना बालपणापासूनच करावी लागली.

पूर्वजन्मीच्या सुकृताप्रमाणे श्री बाबांना लहानपणापासूनची ओढ होती. श्रीक्षेत्र या गावाच्या बाहेर वर्धा नदीच्या तीरावर देवीच्या देवळात बाबा ध्यानमग्न होऊ लागले. ईश्वराच्या भेटीची आर्तता असल्याने श्री संत शंकर बाबा लहानपणापासूनच 'श्री क्षेत्र टाकरखेडा ग्रामी' श्री सद्गुरू लहानुजी महाराजांच्या दर्शनाला पायीच जात असत. बरेचदा त्यांना वर्धा नदीच्या पुरातूनसुद्धा जाणे-येणे करावे लागत असे. असा हा जीवनक्रम सुरू असताना श्री बाबांच्या अंत:करणातील भक्तिभाव व आर्तता पाहून श्री संत लहानुजी महाराजांनी सन १९५९ ला त्यांच्यावर कृपा केली. सन १९५९ ला श्री सद्गुरू लहानुजी नाथांनी यांना उद्देशून शब्द उच्चारले की, 'अक्कल साया, चार वर्ष' कालांतराने ते खरे ठरले व तद्नंतर

"म्हणे लहान्या हा घे डोळा। जाणावे तया सर्वकाळ ॥
    अक्कल लेका भिवया निळा । स्थानी पाहावे॥'


अर्थात यांना ईडा, पिंगळा व सुषुम्नेच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या दिव्य ज्योतीच्या प्रकाशात स्वतःचे स्वरूप पाहण्याचे सामर्थ्य लाभले. सन १९६५ ला श्रींच्या दर्शनाला गेले असता यांच्या नारळाला स्पर्श करीत श्री लहानुजीनाथ उच्चारले की, "गोन्हं लहानपणीच ठेचलं पाहिजे. गोह्याचाच बैल बारा वर्षांत होतो." अशाप्रकारे १२ वर्षांची उपासना सांगून अक्कल लेका, सडक कुदावी लागते, सांभाळशील काय? होय सांभाळन-सांभाळन. अर्थात संसाररूपी सडक पार करून मायेचा त्याग करावा लागेल व ती सांभाळण्याची पात्रता यांच्यात आहे, असे आशीर्वादिक शब्द लाभले. नंतर गुरुदेवांच्या शब्दांचे पालन कडक व्रताद्वारे करून-

"ओम सोहम् लहानुजी नाथे मंत्र चोकीयले दिनरात ।।
    याची गुणे पुण्य परमार्थ । मजशी लाभीयले हो ।"
अर्थात षडरिपूतून मुक्त होऊन समत्व अवस्था प्राप्त झाली.

श्री बाबांचे वास्तव्य सुरुवातीला गावामध्ये श्री. माणिकराव हारगोडे यांच्या घरातील एका बाजूच्या कौलारू खोलीत असायचे, आज त्या ठिकाणाला जुना आश्रम म्हणून संबोधतात. त्या जुन्या आश्रमात लोक दर्शनाला येऊ लागले. श्री बाबा दर्शनार्थीचे प्रश्न सोडवू लागले, तशी श्री बाबांवर लोकांची श्रद्धा बसू लागली. त्यांना गुरुकृपेमुळे लाभलेल्या सहजसमाधीच्या अवस्थेमुळे सुरुवातीला श्री बाबा एकांतवासात विदेही अवस्थेत राहत असत. परमहंस सद्गुरुश्री लहानुजी महाराज देह सोडण्यापूर्वीच आशीर्वादरूपाने सांगून गेले. म्हणाले, “तू हा लहान्याचा डोळा घे. तुला मी देतो! निरंतरचा तू माझा आहेस, हे सांभाळशील !! अखंड नामस्मरणाच्या निमित्ताने वीणेचा अखंड पहारा ठेव. यापुढे तो 'सत्या' (श्री संत सत्यदेव बाबा) आहे, तिकडे त्याच्याकडे जात राहावे. ते तुझे समाधान करतील." असे सांगून कृपाशीर्वादः दिला. नंतर त्यांना श्री संत लहानुजी महाराज यांचे गुरुबंधू परमहंस श्री संत सत्यदेव बाबा यांचा सहवास लाभला.

श्री परमहंस सत्यदेव बाबांनी श्री संत शंकर बाबांना स्वतःचा आश्रम बांधून दिला. श्री सत्यबाबा म्हणाले, “तू धोकणी करू नको, आम्ही आश्रम बांधाले पैसे देतो, हे घे पैसे," असे म्हणून श्री संत सत्यदेव बाबांनी स्वतःच्या खिशातून २ रुपये काढून श्री संत शंकर बाबांना दिले. त्यानंतर भक्तानी कोणी १००१, कोणी ५०१, कोणी २०१, तर कोणी १०१ रुपये श्री संत शंकर बाबांना दिले व पुढे वर्गणी येत राहिली. अशा तऱ्हेने त्यांचा आश्रम बांधायला सुरुवात झाली व १९७१ साली श्री बाबांचा आश्रम साकारला गेला. सध्या आहे तोच हा आश्रम होय.

   ग्रंथ लेखनाचा आदेश (सन १९६८)
"सद्गुरू लहानुजी बाबा बैसूनी जे जे बोलिले असे वाणी ।।
   तेची ती प्रतिध्वनी । निवेदिली असे।।"

सन १९७४ 'सद्गुरू दर्शन' नावाची पुस्तिका प्रकाशित केली. गुरुकृपा कशी लाभली व स्वतःच्या स्वरूपाशी एकरूप करून घेतल्याची स्पष्ट कल्पना या पुस्तिकेत पाहावयास मिळते. सन १९७९ ला 'सद्गुरू महिमामृत' नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. यात गुरुपरंपरा, सद्गुरूचे लक्षण, शुद्ध सात्विक शिष्य कसा असावा, ढोंगी गुरू कसा असतो, ढोंगी शिष्याची लक्षणे, या विषयाचे ज्ञान थोडक्यात कथन केले आहे. या ग्रंथाद्वारे आध्यात्मिक मार्ग अधिक सुलभ झाला आहे. दि. २८-३-९६ श्रीरामनवमी रोजी 'अनुभव ब्रह्म' या ग्रंथाचे प्रकाशन झाले. यामध्ये त्राटक साधना, देहातील पवित्र नद्यांची माहिती व षटचक्रे, सप्तसमुद्र, राजयोग, ध्यान आणि योग मार्गातील माहिती सांगितली आहे.


गुरुपरंपरा


गुरुशिष्य परंपरेचे वर्णन करताना संत श्री शंकर बाबा लिहितात -

"वसिष्ठे पूर्वेस आर्वी शहर। पवित्र ते साधुसंतांचे माहेर ।।
होवोनिया गेली योगिनीश्वर । मायबाई गुरूवर्या ॥
ऐसी संतांची कृपा होता। आडकुजीसी लाभे ब्रह्मसत्ता ।।
मायबाईच्या वरदहस्ता भान विरले देहाच
हीच गुरुशिष्य परंपरा पुढे -
"सद्गुरू समर्थ आडकुजी शिष्य तयांचे लहानुजी ॥
सत्यदेव आणि तुकडोजी विश्वामाजी कळस जैसे ।।'


या ग्रंथाचे पठण व मनन नित्यनियमाने केल्यास घराघरातून दिव्यज्योत जागती राहून आध्यात्मिक, आर्थिक, पारमार्थिक व सामाजिक प्रतिष्ठा निश्चित उंचावेल यात संशय नाही.

आश्रमाची निर्मिती, शेतीचा व्यवसाय व आत्मनिर्भरता

या आश्रमाची निर्मिती भक्तगणांच्या हार्दिक सहकार्यामुळे सन १९७४ ला झाली. तद्पूर्वी ते ७ वर्षे गावातील एका पडक्या खोलीत वास्तव्य करीत. आश्रमाच्या मालकीची एकंदर ३०० एकर शेती असून, ती सर्व भक्तगणांच्या सहकार्याने लाभली आहे. गेल्या १६-१७ वर्षांपासून ते शेतीचा व्यवसाय आधुनिक पद्धतीने व कुशलतेने हाताळीत आहेत. त्यासाठी आश्रमात कृषी विभाग आहे. शेती, शंभर-सव्वाशे जनावरे, अखंड अन्नदान, तसेच आश्रमावर होणारा खर्च सातत्याने काढून, आत्मनिर्भरतेचा मार्ग सुकर केला आहे, तसेच आश्रमात कुटिर ग्रामोद्योग विभाग व गोशाळादेखील आहे. श्री सत्यदेव बाबांनी जनसंपर्कासाठी दिलेली जीप आहे.

दिनचर्या, प्रवचनाद्वारे होणारा बोधामृत व प्रसाद ग्रह करण्याची आगळी प्रथा

सकाळी ५ ते १० पर्यंत पूजाअर्चा, चिंतन, ध्यान व समाधीतून निवृत्त झाल्यानंतर ११ ला आश्रमाच्या मध्यखोलीत आसनस्थ होतात. भक्तगण आपला प्रसाद त्यांच्या समोर ठेवतात. सुरुवातीला ते भावावस्थेत स्वसंवाद करतात. त्याला आश्रमात 'लाईन' ही संज्ञा आहे. श्लोकाद्वारे प्रवचनाला सुरुवात करून नंतर त्याचे विश्लेषण करतात. शिवपुराणातील मनोरंजक कथा, अष्टांगयोग, माया व त्याचे बाह्यस्वरूप, 'ओम'ची उत्पत्ती व त्याचे माहात्म्य, वेद व उपनिषदात दिलेले तत्त्वज्ञान, भक्तीचे मार्ग व संतांनी सांगितलेले मार्मिक उपदेश, सोप्या व सरळ भाषेत स्वतःशीच बोलतात. मराठी, हिंदी, संस्कृत व प्राकृत भाषेचा उपयोग करतात. मुमुक्षूंना; तसेच अध्यात्मात रस बाळगणाऱ्यांना हा संवाद चमत्कारिक पण अमृताप्रमाणे गोड वाटतो. कधी कधी हे बोधामृत एवढ्या उच्च स्तरावरील तात्त्विक व गूढगम्य असते की, श्रोत्यांच्या बुद्धीच्या कक्षेत न बसणारे ठरते, तरीही सर्व जण त्यातील गोडवा चाखताना आढळतात.

प्रवचनाचा हा एक-दीड तास संपल्यावर ते आत्मानंदात निमग्न झालेल्या मनाला भक्त मंडळींच्या मनावर आणतात. व त्यांनी आणलेला प्रसाद ग्रहण करतात किंवा परत करताना आढळतात. भक्ताचे आंतरिक भाव ओळखून योग्य मार्गदर्शन करतात.

“सुताचिये गुंजे। आंत बाहेर नाही दुजे ॥ (ज्ञाने.)
याप्रमाणे संसारात राहूनही परमानंदाचा स्वाद चाखीत आहेत.
गुरुस्थानी श्री समर्थ सत्यदेव महाराज, धार्मिक कार्याची नीव
"तुका म्हणे संत ओळखावे कैसे।
आपण व्हावे तैसे तेव्हा कळे।।"


परमहंस श्री समर्थ सत्यदेव महाराजांची ओळख श्री समर्थ लहानुजी नाथांनी सन १९७१ साली यांना करवून दिली. "माझ्यानंतर हा 'सत्या' आहे, लहान्या यांचेकडे लक्ष ठेव" ही गुरुदेवांची आज्ञा समजून ते त्यांना गुरुस्थानी पाहू लागले. श्री सत्यदेवांनी यांचा परिचय अज्ञानी लोकांना करून दिला व प्रचारासाठी स्वतःची जीपगाडी बहाल केली. सन १९७१ ला 'श्रीरामनवमी' महोत्सव साजरा करवून घेतला व सन १९८२ पर्यंत ते जातीने हजर राहत; तसेच गुरुपरंपरेतील संतांच्या पुण्यतिथी व प्रगटदिन साजरे करण्याची नीव टाकली. मौनव्रताची समाप्ती व अन्नाचे सेवन सन १९६६ व १९७८ पर्यंत याना मौनव्रत होते व पुढेही हा क्रम चालू ठेवावा असा मनाचा निग्रह होता; परंतु श्री समर्थ सत्यदेवांनी ''सालबर्डी" या पवित्र भूमीवर भगवान शिवाच्या देवळात या व्रताची समाप्ती करविली. याच पुण्यक्षेत्रात पांडवांनी, ऋषिमुनींनी तसेच नवनाथांनी घोर तपश्चर्या केली आहे. सन १९८० ला श्रीक्षेत्रावर श्री समर्थ सत्यदेव बाबांनी केलेल्या यज्ञावर गुरुदेवांच्या आज्ञेचे पालन समजून यांनी महाप्रसाद ग्रहण केला ही यांच्या जीवनातील नावीन्यपूर्ण घटना होय.

विद्यामंदिराची स्थापना

गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण व राहण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून सन १९८८-८९ ला आश्रमाच्या परिसरात श्री संत शंकर महाराज विद्यामंदिरा'ची स्थापना करण्यात आली. आज या शाळेत २६६ विद्यार्थी शिकत आहेत. आश्रमशाळा आहे. गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवासाची पण व्यवस्था आहे. शाळेत निवास करणारी मुले व शिक्षकगण यांच्या जेवणाची व्यवस्था विनामूल्य असून, यावर होणारा खर्च महाराज स्वतः करतात.

श्री परमहंस महाराजांनी देह ठेवल्यानंतर पुढील सर्वकाळ श्री परमहंस सत्यदेव बाबांनी आपल्या आज्ञेप्रमाणे सहजमार्ग दाखवून दिला आणि आईसारखे प्रेम देऊन आता निर्माण झालेल्या विद्यामंदिराच्या जागेवर पंचवीस वर्षांपूर्वी स्वतःच्या शुभ हस्ते मुहूर्त करून दिला. मुहूर्त करून देताना म्हणाले, "तू आमची काही तरी कार्यक्रमरूपाने सेवा केली पाहिजे. इथे मंदिर बांधून टाक, असे आमचे म्हणणे आहे. आम्ही तुला खूप दिलेले आहे. तू एक मोठा यज्ञ कर आणि श्री देवांच्या व संत महात्म्यांच्या मूर्ती मंदिरात बसवाव्यात. आम्ही सदैव तुझ्या पाठीमागे उभे राहून तुला खूप-खूप देऊ. तू घोकनी (काळजी) करू नको. आम्ही आहे. ""

श्री सत्यदेव बाबांनी निर्वाण समयाच्या आधी येऊन आशीर्वादरूपाने प्रसाद दिला व श्रीरामनवमी महोत्सव, मकर संक्रांतीला लुटीचा कार्यक्रम, हरतालिकेला प्रगटदिन महोत्सव, काकडा समाप्ती, व्यासपूजेचा कार्यक्रम, संतसेवेचा वेळोवेळी आदर ते आजही करून घेतात व वेळोवेळी मार्गदर्शन करतात. 'संतकृपा झाली, इमारत फळा आली.'

अशाप्रकारे या संत महात्म्यांचा आदेश समजून आज या वशिष्ठेच्या परिसरामध्ये संत पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आमच्या या श्रीक्षेत्र पिंपळखुटा येथे 'विश्वमंदिर भक्तिधाम' च्या निमित्ताने श्री देवांच्या, देवींच्या आणि संत- महात्म्यांच्या मूर्तीची श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर पूज्य थोर थोर अशा विद्यमान संत-महात्म्यांच्या उपस्थितीत व वेदांताचार्य, विद्वान, शास्त्री, पंडित अशा थोर ब्रह्मवृंदांच्या शुभ हस्ते विधियुक्त प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पूर्ण झाला. या विश्वमंदिर भक्तिधाम व सद्गुरू लहानुजी नाथांच्या मंदिराच्या सर्व कळसांना नव्वद तोळे सोन्याचा पत्रा श्रीकृपेने आहे.

Shri Sant Shankar Maharaj