Shri Sant Shankar Maharaj
            

श्री संत शंकर महाराज आश्रम व विश्वमंदिर भक्तिधाम

श्री क्षेत्र पिंपळखुटा ता. धामणगांव(रेल्वे) जि. अमरावती (महा.)

विश्वमंदिर भक्तिधाम

श्री संत शंकर महाराज संस्था


पुन्हा पुन्हा आता हाच उपदेश आहे की आपल्या अंत:करण रुपी घरात ही एकत्वरूपी ज्ञानसंपत्ती आल्यानंतर ज्ञात ज्ञेयभावाच्याही पलीकडे असलेले जे सचिदानंद पद आहे त्या सचिदानंद पदावर आपण आरुढ व्हावे ही अभिलाषा आहे. प्राप्त लौकीक जागृतीला पार करुन आत्मजागृती अर्थात प्रत्यक्ष स्वरुप जागृती आणि लौकीक निद्रेच्या पलीकडे वृत्तीशून्य नावाची आत्मस्वरूप निद्रा या दोहोंचे विशेष भाववर्णन करुन आशीर्वादाच्या भूमिका इथे स्पष्ट केलेल्या आहेत.

अशाप्रकारे ब्रम्हम्यैक्य साक्षात्कारात ईच्छेची निवृत्ती होते. यातच खरी निरंकुशा तृप्ती आहे. हेच फार मोठे आहे की जे सत्पदाच्या कक्षेत आलेले नाही. चित्पदाला विषय झालेले नाही. अशा तऱ्हेचे सहज आपले स्वरुप आपण व्हावे असा अखंड आपला निश्चय आपण करावा. हाच श्री परमहंस संतमहात्म्याचा डोळसपणाचा बोध आहे. हा उचप्रतिचा बोध सहसा अनुभव घेतांना आकलन होत नाही. म्हणून श्रीसंत महात्मे आपल्या सर्वांच्या जीवनाचे सार्थक व्हावयास हवे यासाठी आपणाला सोप्या, सरळ भाषेत हा गुढ अमृतानुभव सांगून गेले आहेत. त्या निर्गुणात्मक ईश्वराचे दर्शन सगुण रुपाने घडावे व सर्वानी तापलेल्या अशा विषमीत संसार-काळ-क्षेत्रामध्ये सुखी व्हावे, आनंदरूप व्हावे त्याकरिताच हा अमृतानुभव श्री परमहंस लहानुजी महाराज देह सोडण्यापूर्वीच आशीर्वादरुपाने सांगून गेले व म्हणाले, "तू हा लहान्याचा डोळा घे. तूला मी देतो! निरंतरचा तू माझा आहेस, हे सांभाळशील !! अखंड नामस्मरणाच्या निमित्ताने वीण्याचा अखंड पहारा ठेव. यापुढे तो 'सत्या' (श्रीसंत सत्यदेव बाबा) आहे. तिकडे त्याच्याकडे जात राहाव. ते तुझे समाधान करतील.' " असे सांगून कृपाशिर्वाद दिला.

श्री परमहंस लहानुजी महाराजांनी देह ठेवल्यानंतर पुढील सर्वकाळ श्री परमहंस सत्यदेव बाबांनी आपल्या आज्ञेप्रमाणे सहजमार्ग दाखवून दिला आणि आईसारखे प्रेम देऊन आता निर्माण झालेल्या विश्वमंदिराच्या जागेवर पंचवीस वर्षापूर्वी स्वतः शुभ हस्ते मुहूर्त करुन दिला. मुहूर्त करून देतांना म्हणाले, " तू आमची काहीतरी कार्यक्रमरुपाने सेवा केली पाहिजे. इथे मंदिर बांधून टाक, असे आमचे म्हणने आहे. आम्ही तुला खूप दिलेले आहे. तू एक मोठा यज्ञ कर आणि श्री देवांच्या व संत महात्म्यांच्या मूर्त्यामंदिरात बसवाव्यात. आम्ही सदैव तुझे पाठीमागे उभे राहून तुला खूप-खूप देऊ. तू घोकनी (काळजी करु नको. आम्ही आहे."

परमहंस श्री सत्यदेव बाबांनी निर्वाण समयाच्या आधी येऊन आशीर्वाद रुपाने प्रसाद दिला व श्रीरामनवमी महोत्सव, मकर संक्रांतीला लुटीचा कार्यक्रम, हरतालीकेला प्रगटदिन महोत्सव, काकडा समाप्ती, व्यासपुजेचा कार्यक्रम, संत सेवेचा वेळोवेळी आदर ते आजही करुन घेतात व आजही वेळोवेळी मार्गदर्शन करतात. " संतकृपा झाली / इमारत फळा आली "

अशाप्रकारे या संत महात्म्यांचा आदेश समजून आज या वशिष्ठेच्या परीसरामध्ये संत पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आमच्या ह्या श्री क्षेत्र पिंपळखुटा येथे 'विश्वमंदिर-भक्तिधाम' च्या निमित्ताने श्री देवांच्या देवींच्या आणि संत महात्म्यांच्या मूर्त्यांची श्री रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पूज्य थोर थोर अशा विद्यमान संत महात्म्यांच्या उपस्थितीत व वेदांताचार्य, विद्वान, शास्त्री, पंडीत अशा थोर थोर ब्रम्हवृदांच्या शुभ हस्ते विधीयुक्त प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पूर्ण होत आहे. हे सर्व या संत पुरुषांचे कृपापात्र आहेत. कल्पकोटी सुखाचे दान हे श्रीसंत महात्मे देतात. तेच या सर्वांना आणि सर्व अखंडदानी, अखंडयात्री, अखंडवारी करणारांना अखंड नामस्मरण रुपाने वीणा पहारा करणाऱ्यांना व या महान पवित्र व पुण्य कार्यात वेगवेगळ्या प्रकारे सहभागी होणाऱ्या इतर सर्व सद्विवेक भावीक भक्तांना प्राप्त होईल. या सर्वांचे त्रिविध पाप ताप या विश्वमंदिर-भक्तिधामाच्या दर्शनाने त्रिवेणी संगमाप्रमाणे निघून जातील आणि या निर्दोष अशा आनंदाचे स्थानी आपले जीवीत बनून चार खाणी, चौऱ्यांशी लक्ष योनींच्या फेन्यातून मुक्त होतील. त्या दुःखातून मुक्त होण्याचे या जड जीवांमध्ये जे कोणी साधन असेल तर हेच आहे. येथे संत महात्मे आशीर्वादाचे छत्र करुन जडजीवांना पुनीत करतात आणि सर्व दु:खातून मुक्त करतात.

आनंदामृतामध्ये वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात-

जे स्वानंदाचे अमृत। आत्ममंथने होय प्राप्त ॥जयाचिये जीव प्रशांत सुख-दुःखातीत होतसे ॥ ते लाभावे सकळाशी
। यावी पात्रता मनःबुद्धिसी । म्हणोनी बोलीलो बहूसाधनेसी। प्रकृती भेदा जाणोनी ॥


तसेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात-

फिटो विवेकाची वाणी। हो कानामना अथवा जनी ॥ आवडे ती खाणी । ब्रम्हविद्येची ॥दिसो परतत्व डोळां ।
रिघो महाबोधाचा उमाळा ॥ नांदो सुखाचा सोहळा। माजी विश्व ॥ असे संतानी आशीर्वादात्मक बोधवचनाचे


वर्णन केलेले आहे.पुढे माऊली म्हणतात- "संतांच्या भेटीत, दर्शनात जो आनंद होतो तो वर्णनातीत व अतूलनीय असतो. त्या आनंदाचे प्रात्यक्षिक भावाचे वर्णन करुन सांगतात-
'संत भेटती आजीमज। तेणे झालो चतुर्भुज। दोन्ही भूजा स्थूली सहज। दोन्ही सुक्ष्म वाढीयल्या ॥ आलींगने सुख वाटे । प्रेमे चिदानंद गोठे ॥ हर्ष ब्रम्हांड उतटे। समूळ उठे मी पण ॥ या संतांशी भेटता । हरे संसाराची व्यथा । पुढता- पुढती माथा। अखंड ठेवीन । या संतांचे देणे। कल्पतरुहूनी दूणे ॥ परीसा परीस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा ॥ या संतापरिस उदार । त्रिभूवनी नाही थोर । मायबाप सहोदर । इष्ट मित्र सोईरे । कृपा कटाक्षे न्याहाळीले। अपूले पदी बैसविले । बाप रखमा देवी परे विठ्ठले। भक्तां दिघले वरदान ||
माऊलिच्या गाथेप्रमाणे असा संत कृपेचा दीवा स्पष्ट आणि उजळ आहे. 'जीणे आणि मरणे' हे दोन्ही टोक भक्तिच्या गाभाऱ्यांत मावळून जातात व कल्पकोटी अशा निरंतरच्या सुखाचे साधन साध्य होते. असे हे निरंतरचे विशाल असे तीर्थस्थान 'विश्वमंदिर-भक्तिघाम' संत कृपेचे प्रतिक आहे. तेच आमचे सर्वांचे उद्धरण्याचे स्थान बनले आहे. आम्ही नेहमी त्यांच्या सेवेचा व स्मरणातूल्य अशा भक्तिचा पाईक बनावे आणि आपले अमूल्य जीवनाचे व सुखाचे वास्तव्य अमृततुल्य असा सार्थ मिळवून आम्ही आमचे स्वतंत्र जीवनाचे कल्याण करावे हीच सदिच्छा बाळगून माझे शब्द ईथेच थांबवतो- दास शंकर
विश्वमंदीर भक्तीधाम आश्रम" हे महान संस्कार केंद्र आहे. मानवाला आत्मा आणि बुद्धीवर साचलेली दुष्कृत्याची धुळ स्वयंप्रेरणेने आणि सहजगत्या झटकायला लावणारे एक परमपवित्र मंदीर आहे. कृषी, पशुपालन, समाजसेवा, शिक्षण याचा प्रसार करुन मानवाच्या अंतरातील अंतर मिटवून सहानुभव, सौजन्य सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे अखंड अव्याहत शिक्षण देणारे लोक विद्यापीठ म्हणजे श्री संत शंकर महाराजांनी निर्माण केलेला विश्वमंदीर भक्तीधाम आश्रम होय.
आज समाजात अंधश्रद्धा भरपूर प्रमाणात बोकाळली आहे. आणि या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन माणूस स्वत:ला विसरु पहात आहे. माणुसपण हरवलेल्या माणसाला स्वत:मधला माणूस शोधण्याची प्रेरणा देणार एक जीवंत स्फुर्तीस्थान आणि जगाच्या दाटलेल्या काळोखात आपला मार्ग सुकर व्हावा यासाठी माणसाच्या हृदयात, आत्म्याचा दीप सतत प्रज्वलित ठेवण्याची प्रेरणा देणारा भक्ती आणि अध्यात्माचा महन्मंगल स्त्रोत म्हणजे विश्वमंदीर भक्तीधाम आश्रम या पवित्र गंगेच्या तीरावर येऊन जीवनातील पाप, ताप, आणि शापातून मुक्त व्हावे.
कालचक्र अविरत फिरत आहे. ते कोणाचीही तमा बाळगत नाही. म्हणुन श्री संत शंकर महाराज यांनी पिंपळखुटा ता. तिवसा जि. अमरावती येथे विश्वमंदीर भक्तीधाम आश्रमाची निर्मित करुन पुरुषार्थ साधणाऱ्यांना ही सुवर्णसंधी, मंगलयोग प्राप्त करुन दिला आहे. या विश्वमंदीर भक्तीधामाचे एक भक्त, सेवक बनुन आपणही ह्या संधीचा फायदा घेऊ या आणि मानवी जन्माचे सार्थक करण्यासाठी तन मन धनाने सहकार्य करु या.
विश्वमंदीर भक्तिधामाची स्थापना :
विश्वमंदिर भक्तीधामाचे मुहूर्त श्री समर्थाच्या शुभ हस्ते दि. १७-३-१९९४ ला करण्यात आला. आज या वास्तूचे काम पूर्ण झाले आहे. श्रीरामनवमी महोत्सव १९९५ च्या शुभ मुहूर्तावर गुरुपरंपरेतील संत मंडळीच्या, सिद्ध पुरुषांच्या, देवी-देवादिकांच्या, नवनाथांच्या संगमरवरी दगडांच्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा व्हावी अशी ईच्छा महाराजांनी व्यक्त केली आहे. मानवाच्या उद्धारासाठी केलेल्या नियोजनात तन-मन-धनाने सहभागी होऊन स्वत:चे जीवन कृतार्थ करुन घेण्यातच जीवनाचा खरा आनंद सामावलेला आहे.
श्री गुरुदेव चरणी समर्पित !

Shri Sant Shankar Maharaj