श्री संत शंकर महाराज आश्रम व विश्वमंदिर भक्तिधाम
श्री संत लहानुजी महाराजच्या आईचे नाव भिमाबाई आणि पित्याचे नांव अभिमानजी भांडे असून त्यांचे सन १८८४ साली "फाल्गुन शुद्ध द्वितीयेला" सोमवारी जन्म झाला.जन्मस्थान मंगरूळ दस्तगीर ता. धामणगाव रेल्वे जि.अमरावती आहे . श्री संत लहानुजी महाराजच्या आईचे नाव भिमाबाई आणि पित्याचे नांव अभिमानजी भांडे असून त्यांचे जन्मस्थान मंगरूळ दस्तगीर ता. धामणगाव रेल्वे जि.अमरावती आहे. भिमाबाईच्या पोटी दोन मुलांचा जन्म लिहिण्यात आले होते. भिमाबाई आधीपासूनच शिवभक्त होती. “देव भावाचा भुकेला" देवाजवळ शुद्ध अंतकरणाने फक्त भाव अर्पण करा-आपणास सर्व काही मिळू शकते ! भिमाबाईच्या जीवनात हेच घडले ! मोठा मुलगा गणपत आणि धाकटा मुलगा श्री संत लहानुजी महाराज . हे सर्वजण सुखी समाधानाने आनंदमय वातावरणात येणारे दिवस घालवू लागले.
"सद्गुरुवाचूनी सापडेना सोय। धरावेते पाय आधी आधी" (तुका...)
पुरातन काळात अनेक थोर साधु, संत, ऋषी, महर्षी, तपस्वी, योगी, सन्यासी, उदाशी वगैरे आपल्या भारतात सद्गुरु कृपेनेच अमरत्वाला प्राप्त होऊन गेलेत आणि आजही या भारतात त्या परंपरेनेच सद्गुरु कृपेच्या आधारेच अनेक साधुसंत, सत्पुरुष आत्मस्वरुपी स्थित झाले आहेत. त्याच पुण्य-प्रभावाने हे विश्व कायम आहे, असे मी समजतो. प्रत्येक युगात ईश्वराने आपल्या अवतार लिलेने भक्तावरील संकट दूर करून दुष्टांचा संहार केला व सत्पुरुषांना हाताशी धरून स्वधर्माची निर्मिती केली व आजही भक्ताच्या आर्ततेनुसार प्रसन्न होऊन विश्वातील प्राणीमात्रांना सुखसमृध्दी प्राप्त करून देत आहे.
““लोह परिसासी न साहे उपमा। सद्गुरु महिमा अगाधची" (तुका...)
सद्गुरु समर्थ लहानुजी महाराज हे जनतेला सन्मार्ग दाखविणारे, त्यांना आपत्तीतून मुक्त करण्यासाठी आणि सर्वांना सुख व शांती लाभण्यासाठी आपल्या देहाची पर्वा न करता निरंतर जनसेवेतच सुख मानून घेणारे, सर्व करूनही अकर्ती दशा अनुभवणारे, सदैव सच्चिनंद स्वरुपात निमग्न असणारे आहेत. अशा सद्गुरुंनी मला तारले आहे. त्यांच्या कृपे शिवाय जीव-जंतु सुध्दा जीवंत राहू शकत नाही. गुरु कृपेशिवाय परब्रम्ह तत्वाचे ज्ञान होत नाही. त्या तत्वांची मला जाणीव होत आहे. इंद्रिये मनाच्या आहारी येतात, मन वायुशी एकजीव होते आणि तो आपोआप चिदाकाशात समरस होऊ लागतो व त्यालाच आपण समाधीची अवस्था म्हणुन संबोधतो. सुगंध चंदनरूप धारण करतो, त्याचप्रमाणे संतोष मनाच्या रुपाने प्रगट होतो. अर्थातच नंतर मोक्ष सिध्दीची सर्व साधने आपोआपच त्याच्या मागे लागून येतात. त्यामुळे तो त्या कृपेच्या बळाने सहजच विवेक साम्राज्याचा धनी होतो. परिणाम स्वरुप जे विचाराच्या कक्षेत बसत नाही अशा त्या परब्रम्हाशी तो एकरुप होतो. वरचे अभ्र वितळून जाते. वायुचे वायुपणही मावळते आणि चिदाकाशही आपल्या स्वरुपातच - लय पावते. व नंतर ओंकाराचा माथा गडप होतो. अशाप्रकारे अगाध सुख गुरुकृपेने 'त्याला लाभते. अशा प्रकारच्या ब्रम्ह स्थितीला परमगति असे म्हणतात. त्या निराकार अवस्थेची तो गुरुकृपेच्या आधारे मूर्तीच बनून राहतो. हे आत्मीय परमसुख गुरुकृपेशिवाय अन्य कोणत्याच मार्गाने लाभू शकत नाही. म्हणून गुरुकृपेचे वर्णन शब्दाने स्पष्ट करता येत नाही. म्हणून वाचकांना अशी सूचना आहे की त्यांनी जागरुक पणाने या गुरुकृपेच्या शब्द रचनेचा विचार करून त्यातून निघणारे काही चांगले निष्कर्ष आपल्या दृष्टीपुढे ठेवावेत आणि त्यातील आठवणी समोर ठेऊन आपला सत्कार्याचा मार्ग नेहमी आक्रमण करावा.
सद्गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी।। (तुका...)
"तत्वं पार्थस्व कृष्णेन युद्धवस्य हितेनच। ब्रम्हादी सनकादिना हंसरुपेनं, बोधितम् ।।
हे सनातन महत्तत्व सांदीपनिंनी श्रीकृष्णास सांगितले, श्रीकृष्णाने पार्थास व उध्दवास सांगितले व सोहं ब्रम्हाने हंस रुपाने ब्रम्हदेव आणि सनकादिकासही बोधिता झाले आणि दत्तात्रयादी सिद्धांनी, नवनाथांना गुरुकृपे सोहंस्वरुपी मिळविले. तोच बोध श्रीरामास वसिष्ठाने, परशुरामास दत्तात्रयाने केला. त्याच नवनाथातून गहणीनाथाने निवृत्तिनाथास व त्यांनी ज्ञानेश्वरास गुरुकृपेने बोधिले. त्याचप्रमाणे मायबाईने (आर्वी) श्री समर्थ आडकुजी महाराजास अनुग्रहीत केले. समर्थ आडकुजींनी परमहंस लहानुजी महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि श्री समर्थ सत्यदेव बाबा (वरखेड) यांना कृपाप्रसादे आत्मस्वरुपी रंगविले. हीच परंपरा नेहमी जागती राहावी म्हणून त्यांच्या अमृत वाणीची आठवण जागृत ठेवावयास पाहिजे. सद्गुरू श्री समर्थ लहानुजी बाबांच्या दर्शनाला जेंव्हा जेंव्हा आम्ही गेलो तेंव्हा तेंव्हा आम्हाला जो अनुभव आला, तो मी माझ्या अल्पमते वाचकांच्या समोर मांडत आहे. मी समर्थ सद्गुरू लहानुजी बाबांच्या शब्दांचा (बोलण्याचा) अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
जय गुरुदेव.....दास शंकर