Shri Sant Shankar Maharaj
            

श्री संत शंकर महाराज आश्रम व विश्वमंदिर भक्तिधाम

श्री क्षेत्र पिंपळखुटा ता. धामणगांव(रेल्वे) जि. अमरावती (महा.)

श्री संत सत्यदेव महाराज यांच्याविषयी थोडेसे...

श्री संत शंकर महाराज आश्रम व विश्वमंदिर भक्तिधाम

ब्रह्म प्राप्तीसी उपाय । धरी संताचे ते पाय। तेणे साधती साधने । तुटती भवाचे बंधने ।।

वेदशास्त्रे देती ग्वाही । संतावाचुनि प्राप्ती नाही। एका जनार्दनी संत । पुर्ण करिती मनोरथ ।।


एकनाथ महाराज

श्री समर्थ सत्यदेव दर्शन' या स्वरुपावर काय लिहावे? वाणीने जसे अबोलच होऊन राहावे, असे होते. अत्यंत निर्विषय झालेल्या कोणत्याही विकाराने वा वासनेने न चळणाऱ्या अशा प्रशांत चित्तामध्येच ज्याचा साक्षात्कार व्हावा, श्री गुरु आडकोजी महाराजांचे स्मरणी-चिंतनी अभ्यासमय तपचर्या, निर्विकल्पता इत्यादी अलौकीक गुण ज्यांच्या सहज साधनेमध्ये संपदेने युक्त असलेल्या परिणत प्रज्ञेलाच ज्यांचे दर्शन व्हावे, ज्यांच्या दिप्तीने सुर्यप्रकाशालाही मदत व्हावी, ज्यांचा आल्हाद पुर्णचंद्राच्या शारदीय कौमुदीलाही आकर्षक वाटावा, तसेच ज्यांच्या रसमयतेने साक्षात अमृताच्या तोंडालाही पाणी सुटावे असे हे श्री समर्थ सत्यदेव दर्शन स्वानंद रूप आहे!

मोटकी देहाकृती उमटे। आणि निजज्ञानाची पहाट फुटे।

सूर्यापुढे प्रगटे । प्रकाश जैसा । । ४५२ ।।

तैसी दर्शची वाट न पाहता । वयसेचिया गावा न येता ।

बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ।।४५३ ।। .................(ज्ञानेश्वरी अध्याय ६)


श्री ज्ञानेश्वर माऊलीने स्वानुभव पुर्ण वर्णन केलेली सहज सिध्दांच्या वरील लक्षणांची अनुभूती श्री सत्यदेव बाबांच्या लीलाजीवन चरित्रामध्ये सर्वभक्तपरिवारांच्या अनुभवास आलेली आहे. श्री समर्थ आडकोजी महाराजांची म्हणजेच स्वतःच्या श्री गुरुची आज्ञा, आपल्या जीवनाचे व्रतस्थ म्हणून, शेवटच्या श्वासापर्यंत पाळणारे नामवंत तपस्वी व त्यागी गुरुपुत्र म्हणून श्री समर्थ सत्यदेव बाबांना आम्ही अगदी जवळून प्रत्यक्षपणे पाहिले आहे!

श्री ज्ञानेश्वर माऊली चांगदेव पासष्टी मध्ये शेवटच्या ओवीमध्ये म्हणतात

'निदे परौते निदजणे । जागृति गिळोणी जागणे।

केले तैसे गुंफणे । ज्ञानदेव म्हणे ।।



अर्थ :- श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 'मी या ओव्या गुंफून प्रारब्ध प्राप्त लौकीक निद्रेच्या पलीकडे वृत्तीशुन्य जी आत्मस्वरुप निद्रा आहे आणि प्रारब्ध प्राप्त लौकीक जागृतीला गिळून प्रत्यक्ष स्वरुप जी आत्मजागृती आहे, अशी निद्रा आणि अशी जागृती चांगदेवाला प्रदान केली आहे.

त्याप्रमाणेच परमहंस आडकोजी महाराजांच्या कृपेने श्री समर्थ सत्यदेव बाबांना वृत्तीशुन्य आत्मस्वरुप निद्रा, (लौकीक निद्रेच्या पलीकडे असलेली निद्रा.) प्राप्त झाली होती. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही त्यांच्या लिलेने सहज जवळून घेतला आहे. आपल्याला लौकीक निद्रा आहे. पण ती स्वप्नवत असून स्वप्नाचे विशेषगुण वृत्तीमध्ये जागे होतात. ही निद्रा जगामध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये आहेच. त्याला काही विशेष महत्व देण्यासारखे नाही. सद्गुरुच्या कृपेने वृत्तीचा अभाव करुन आत्मस्वरुपामध्ये स्थिर झालेल्या दशेला वृत्तीशुन्य नावाची अलौकीक निद्रा म्हणतात. ज्या वृत्तीनी निद्रेला जावे आणि पुन्हा जागृतीला परत येवूच नये, तेथेच ब्रह्मभावामध्ये एकरस व्हावे, त्यालाच 'ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता' असे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. यालाच जीवन मुक्त असेही म्हणतात.

तसेच जागृती दोन प्रकारची आहे. एक लौकीक जागृती व दुसरी वृत्तीशुन्य नावाची आत्मजागृती. जो आत्मजागृतीला येतो त्याचा नामरुपांनी तू मी' या सर्व "जगाचे उपाधीभेदांचा मावळच होतो.


कायद्यावे त्यासी व्हावे उतराई ।

ठेविता हा पायी जीव थोडा ।।

आपणा सारिखे करिती तात्काळ |

नाही काळ वेळ तया लागी ।।

असे आपण दयाळू व कृपावंत आहात.


अलीकडच्या काळात आपल्या सर्वज्ञत्वाची, व कृपाकटाक्षाची परंपरा श्री समर्थ सद्गुरु मायबाई, श्री समर्थ आडकोजी महाराज, श्री समर्थ लहानुजी महाराज, श्री समर्थ वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री समर्थ सत्यदेव बाब महाराजां पर्यंत चालत आलेली आहे. हा सर्व बेंडूजी महाराजांचा परंपरागत वारस आहे. तो असाच पुढेही चालत राहील..



आपले शब्द हे बहुसार अनंत उपकाराची राशी।

म्हणून चालविले मागे येतील त्यासी ।

मागोणी आली वाट सिध्द ओळीची तैसी।

तरले तरले गा आणिकही विश्वासी ।।१।।

जगाच्या कल्याणा। संताच्या विभूती।

देह कष्टविती परोपकारे ।।१।।



श्री समर्थ सद्गुरु सत्यदेव बाबा महाराजांची लिला अतर्क्य आहे. त्यI जाणून व अनुभवून आम्ही सद्गदित झालो! मंत्रमुग्ध झालो!! त्यांचे चरणावरु अनन्य भावाने जीव-पंचप्राणांची ओवाळणी करुन उतराई व्हावे असे वाटते.



म्हणती दास हा कृतकृत्य झालो ।

चरणी स्थिरावलो आपुलीया ।।



वैराग्य भावभक्ती धरुन कायावाचा मनाने श्री गुरु सत्यदेव बाबा महाराज चरणा वरुन ओवाळणी करतो आणि अनन्य भावाने सर्व संताच्या चरणी श । होऊन माझ्या भावपुष्प वर्णनाच्या विचारांना विराम देतो!

आपला चरणरज,
श्री संत शंकर बाबा, श्री क्षेत्र पिंपळखुटा'

ओहम् सोहम् आडकूजी' हा पहिला मंत्र आणि 'आपल्यावाले' हा ज्याचा भाव. जे बोलतील ते सत्य हे श्री गुरु नि गुरु बंधू यांचे आर्शीवचन लाभलेली चंपत नावाची वृत्ती सत्यदेव ओळखल्या जावू लागली.

श्री सत्यबाबा हे निर्विकल्प व शुद्ध वृत्तीचे संत पुरुष आहे. त्यांचे ब्रह्मचर्य, त्यांची गुरुनिष्ठा, त्यांचा भोळेपणा व निर्मळता फार थोर आहे. आम्ही दोघेही सद्गुरु आडकुजी महाराजाजवळ रहालो आहो. ते बरेच दिवस मुके होते. परमहंस आडकुजी महाराजांच्या कृपेने त्यांना वाणी सिंद्धता लाभली आहे. हे मी पाहिले आहे. मी भिक्षा मागून आणत होतो आणि त्यात सद्गुरु आडकुजी महाराज, सत्यबाबा, लहानुजीबाबा, कोणी संत महात्मा, अतिथी, पशू-पक्षी व मी असा आमचा दैनिक । पंचयज्ञ चालत होता. सत्यबाबांचे बालक वृत्तीला मी बाळपणापासून पहातो आहे 'तित मला तिळभरही फरक पडलेला दिसला नाही. ते लहानपणी जसे होते तसेच आजही आहे. बऱ्याच सत्पुरुषात परिवर्तन होतांना मी पाहिले आहे पण पू. सत्यबाबाची वृत्ती सारखीच आहे आणि अखंड ती स्थिती टिकून रहाणे यातच संतांचे थोरपण आहे. श्रेष्ठत्व आहे.


माझ्यावर यांचे पूर्वीपासून फार प्रेम आहे. त्यांचे आई, वडीलही माझ्यावर अतिशय निर्मळ प्रेम करीत होते.

सद्गुरु आडकुजी महाराजाजवळ अध्यात्म शक्तिचा फार मोठा खजीना आहे आणि तो सर्वांना खुला आहे. परंतु त्यांचा काही अंश तरी येथून नेण्याकरिता आपण तयारी केली पाहिजे. या परमहंसाच्या परमदयेने लहानुजी महाराजासारखेही सत्पुरुष घडले आहे. आताआपण स्वामीजीसारख्या पुरुषाचा आदर करणे व त्यांचा विचार आत्मसात करणे शिकलो पाहिजे. संत विचारांचा आदर करणे यालाच मी खरी पूजा समजतो. धर्म समजतो. सद्ग्रंथसुद्धा घरात ठेवून जीवन घडविता आले पाहिजे आणि याला मी खरा काला समजतो.


आम्हा सर्वांना त्या सद्गुरु परमहंस आडकुजी महाराजांनी! सेवेसाठी शक्ती, बुद्धी द्यावी ही प्रार्थना !...............तुकड्यादास

संतमुखे आठविला


श्रीसंत सत्यबाबा व मी आम्ही श्रीसमर्थ आडकुजी महाराजाजवळ रहालो आहो. त्यांच्या निर्विकल्प-बालक वृत्तीला मी बाळपणापासून पहातो आहे ते जसेच्या तसेच आहे. त्यात तिळमात्रही फरक पडलेला नाही आणि तेच त्याचे भूषण आहे..
- वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
आम्ही गेल्यानंतर आता हाच आहे. पहिलेपासून असाच राहिला. आडकुजी बाबांची ! दया आहे. त्यांनी याला याच वृत्तीत ठेवले आहे.
-श्रीसंत लहानुजी महाराज
श्रीसंत सत्यदेव बाबांचा सहवास म्हणजे वैकुंठीचा निवास होय. काय त्या भगवान आडकुजी महाराजांची शक्ती ? यांना सहजावस्थेचे अधिकारी बनविले आहे. सत्यबाबा म्हणजे प्रासादिक संत यांनी काही न करता सर्व काही केले आहे.
- योगीराज पू. स्वामी सीतारामदासजी महाराज

श्रीसंत सत्यदेव महाराज म्हणजे 'सत्य शिवं सुंदरम्' सत्य हाच परमेश्वर, सत्य हाच आत्मा, सत्य हेच सुंदरता आणि सत्य हेच चैतन्य. सत्यबाबा समाजाचे प्राण आहे. सत्य शब्द त्यांनाच शोभला आहे.
- श्रीसंत श्रावणजी महाराज
श्रीसंत सत्यबाबाची बालब्रह्मस्वरूप वृत्ती, स्वभावाचा साधेपणा, निर्भयपणा, नैष्ठिक ब्रह्मचर्य, सहजसिनता व अखंडस्थितीची बैठक आदि जे काही त्यांचेजवळ आहे ते सर्व गुरु कृपेचे फळ आहे. त्यांचा माझा संबंध सालबर्डी यज्ञापासून आला आहे. त्यांचे वृत्तीत मात्र बदल झालेला नाही.
- श्रीसंत महाबाहो दामोदरदासजी महाराज
सत्यबाबा म्हणजे आमचे मोठे बाबा! - श्री सच्चिदानंद महाराज
परमहंस श्रीसंत सत्यदेव बाबा! मला गुरुदेव स्वरूप आहे. - श्रीसंत अच्युत महाराज.